बुलडाणा - कोविड रुग्णालयातून प्रोटोकॉलनुसार डिस्चार्ज देण्यात आलेल्या मेहकर तालुक्यातील अंजनी येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने महिलेच्या परिवारातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी 24 जुलै रोजी समोर आले आहे. सदर महिला रुग्णाला डिस्चार्ज दिल्याच्या तब्बल 6 दिवसानंतर तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात अशाप्रकारे प्रोटोकॉलनुसार कोरोनाबाधित असतांनाही रुग्णांना डिस्चार्ज देणे आणि कोरोनाबाधित रुग्णांवर घरीच उपचार करणे धोकादायक ठरणार आहे.
विशेष म्हणजे डिस्चार्ज दिलेल्या या वृद्ध महिलेला ऑक्सिजन कमी मिळत असल्याने, ताप, खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यामुळे सदर महिला रुग्णाला पुन्हा बुधवारी 22 जुलैपासून बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
हेही वाचा - शासकीय कार्यालयांमध्ये 'कोरोना-फिवर,' नागरिक वाऱ्यावर; कर्मचारी भीतीच्या छायेत
केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत कोविड रुग्णासदर्भात नवीन गाईडलाईन काढण्यात येत आहेत. नवीन गाईडलाईननुसार लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची कोणतीही तपासणी न करता त्याला 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात येत आहे. मात्र, हे प्रोटोकॉल येणाऱ्या काळात महामारीचा संसर्ग वाढवण्यासाठी धोकादायक ठरतील असे दिसत आहे.
बुलडाण्यातून अंजनी येथील 60 वर्षीय कोरोनाबाधीत महिला रुग्णाला डिस्चार्ज दिल्याने तिच्या संपर्कात आलेल्या तिच्या परिवारातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे डिस्चार्ज देण्यात आलेल्या महिला रुग्णाला पुन्हा ऑक्सिजन कमी मिळत असल्याने, ताप, खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने 22 जुलैपासून पुन्हा बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा तपासणी न करता प्रोटोकॉलनुसार 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्याच्या आणि कोरोनाबाधित रुग्णाचा घरीच उपचार करणे, या नियमात बदल होणे जरुरी असल्याचे बोलले जात आहे.
उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची कमीत-कमी एकदा तरी तपासणी करून कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यास येणाऱ्या काळात कोरोना महामारीचा वाढणारा संसर्ग अधिक कमी करता येईल.
हेही वाचा - 'भाभीजी पापड' खाल्ल्याने होत नाही कोरोना; राजस्थानच्या मंत्र्यांचा अजब दावा..
मेहकर तालुक्यातील डोंडगांवच्या अंजनी येथील 60 वर्षीय महिलेला संशयीत कोरोना रुग्ण म्हणून बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयात 4 जुलैला भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, 13 जुलैपर्यंत स्वॅबचे अहवाल न आल्याने रॅपिड टेस्टद्वारे महिलेची तपासणी करण्यात आली होती. रॅपिड चाचणीत त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतांनाही रुग्णालयात भरती झालेल्या दिनांकापासून 10 उलटल्याने महिलेला 14 जुलैला प्रोटोकॉलनुसार डिस्चार्ज देण्यात आला होता.
त्यानंतर 20 जुलै रोजी याच महिलेचा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेला कोरोना चाचणी अहवाल डिस्चार्ज दिल्याच्या 6 दिवसानंतर पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यावर मेहकर आरोग्य विभागाच्या डॉक्टरच्या पथकाने महिलेच्या संपर्कात आलेल्यांना आणि कुटुंबीयातील दोन मुले, एक सून, दोन नातू यांना मेहकर येथील कोविड रुग्णालयात क्वारंटाईन केले होते. तसेच संबधित महिलेचे पती यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांच्यावर मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आरोग्य विभागाच्या पथकाने खासगी रुग्णालयातून मेहकरमधील कोविड रुग्णालयात भरती केले होते.
दरम्यान, क्वारंटाईन केलेल्या महिलेच्या परिवारातील 6 लोकांचे स्वॅबचे तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये वृद्ध महिलेचे वृद्ध पती आणि 30 वर्षीय दुसऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुन्हा तपासणी न करता शासनाच्या प्रोटोकॉलनुसार 10 दिवसानंतर संशयीत रुग्णांना डिस्चार्ज देणे, तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर घरीच उपचार करणे, या नियमात बदल होणे जरुरी झाले आहे.
हेही वाचा - विशेष : आकडे बोलतात; मुंबईतील एकूण मृत्यूपैकी निम्मे मृत्यू 'या' सात विभागात