बुलढाणा - एकतर वऱ्हाडी मंडळी गावात उशिरा पोहोचली. त्यातच नवरदेवाची वरात (परण्या) काढण्याला विलंब करण्यात आला. नंतर दारू ढोसून नवरदेवापुढे नाचणाऱ्यांनी कहरच केला. नाचतानाचता रात्रीचे आठ वाजल्याने (Groom delay reach wedding venue) संतप्त झालेल्या वधू पक्षाकडील लोकांनी वऱ्हाड्यांची चांगलीच धुलाई केली. एवढा उशीर का लावला म्हणून नवरीसोबत लग्न लावण्यास नकार देत हळदभरल्या नवरदेवाला भर मंडपातून हाकलून लावण्यात (Bride got Married another Man) आले. लग्नात विघ्न आल्याची ही घटना २२ एप्रिल रोजी मलकापूर पांग्रा येथे घडली.
सिंदखेडराजा तालुक्यातील कंडारी येथील एका कुटुंबातील मुलाचे लग्न मलकापूर पांग्रा येथील एका मुलीशी रीतीरिवाजाप्रमाणे २२ एप्रिल रोजी ठरले होते. लग्नाची सर्व तयारी झालेली होती. नवरी सजून-धजून 'येणार बाई साजन माझा' म्हणत नवरदेवाची वाट बघत भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागली होती. सर्वत्र लग्नाची जोरदार तयारी झाली होती. नवरीकडील वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात येऊन बसली होती. दुपारचा लग्नाचा मुहूर्त ठरलेला होता. मात्र, नवरदेवाचा दुपारपर्यंत गावात पोहोचण्याचा पत्ता नव्हता. नवरदेवासह वऱ्हाडी उशिरा दाखल झाले. त्यानंतर परण्याला सुरुवात झाली. बँड बाजासमोर 'बाराती' बेधुंद होऊन नाचायला लागले. युवा मंडळी तर तर्राट होऊन नवरदेवासमोर नाचत होते.
वधूकडील मंडळींनी नवरदेवाकडील वऱहाड्यांना बदडले - रात्री आठ वाजता नवरदेव लग्नमंडपात पोहोचला. याठिकाणी भेटीगाठी आणि वाघिणशाचा कार्यक्रम झाला. त्याचवेळी उशीर का झाला म्हणत वधूकडील मंडळीने जाब विचारला. शाब्दिक चकमक झाल्यानंतर प्रचंड वाद उफाळला. राग मनात धरून नवरीकडील मंडळी वऱ्हाड्यांवर अक्षरश: तुटून पडली. वधूकडील लोकांनी स्वयंपाकाच्या भल्यामोठ्या सराट्यांनी नवरदेवाचे वऱ्हाड बदडून काढले. दरम्यान, काही समंजस लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. माफीनामादेखील झाला. त्याचवेळी वधूपित्याकडील मंडळींनी आम्हाला या नवरदेवासोबत मुलीचे लग्न लावायचे नाही, असा सूर आवळल्याने वातावरण आणखीनच चिघळले. अखेर नवरदेवाला वधूच्या गळ्यात वरमाला न घालू देताच भर लग्नमंडपातून काढून देण्यात आले.
हेही वाचा - Navneet Rana Love Story : जाणुन घेऊया नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या लव्हस्टोरीबद्दल
वधूकडील मंडळींचा रुद्रावतार - सर्व वऱ्हाड आल्यापावली परतले. नवरदेवही ओल्या हळदीच्या अंगाने पडलेले तोंड घेऊन आपल्या गावी निघून गेला. जी घटना घडली, ती अप्रिय होती, यापुढे कोणत्याच लेकीसोबत असा प्रकार घडू नये, अशी चर्चा सुरू झाली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी सामाजिक भान राखत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या अपमानजनक घटनेने दोन्हीकडील मंडळींना संताप झाला.
नवरीने घेतले नात्यातील मुलासोबत फेरे - आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधूपित्याने उपवर मुलाची काही वेळातच शोधाशोध केली. दुसरबीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत मुलीचे शुभमंगल लावून देण्यात आले.
नवरदेवही नात्यातील मुलीसोबत विवाहबद्ध - सकाळी कंडारी येथून वराकडील प्रतिष्ठित मंडळी मलकापूर पांग्रा येथे दाखल झाली. तुम्ही असे का केले म्हणत जाब विचारला. काही नागरिकांनी मध्यस्थी करून नवरीसाठी बनविलेले दागदागिने आणि मानाच्या साड्या परत केल्या. त्यामुळे वाढणारा वाद मिटला. त्यानंतर देऊळगाव कोळ येथील नात्यातील मुलीसोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचे लग्न उरकण्यात आले.
हेही वाचा - गोष्ट एका अनोख्या लग्नाची.. 66 वर्षांची नवरी आणि 79 वर्षांच्या नवरदेवाने बांधली लग्नगाठ