बुलढाणा : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून संभाजी भिडे हे नाव सतत वादात आहे. भिडेंच्या सतत वादग्रस्त विधानामुळे वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर संघटनांनी भिडेंच्या अटकेचा मुद्दा लावून धरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा खून करणार असल्याचा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडेला अटक करून कारवाई करा, अन्यथा राज्यातील जनतेच्या वतीने मी भिडेचा खून करेन. याला गृहमंत्री जबाबदार असतील, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
संभाजी भिडेंवर कारवाई : महात्मा गांधींविरोधात अपशब्द काढणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी, म्हणून काँग्रेसकडून बुलडाणा जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा निषेध करण्यात आला. यावेळी भिडे हा विकृत मानसिकतेचा माणूस आहे. त्याला देशाचे संविधान, तिरंगा, महात्मा गांधी मान्य नाही. त्यामुळे अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसावर महात्मा गांधींचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले होते.
पत्राद्वारे खळबळजनक इशारा : बुलढाणा व अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मेहकरचे दोन वेळा आमदार राहिलेले व विदर्भातील तत्कालीन प्रभावी नेते सुबोध सावजी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राद्वारे हा खळबळजनक इशारा दिला आहे. आपल्या विधानाचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी सार्वत्रिक केला आहे. या व्हिडिओमध्ये सावजी म्हणतात, विदर्भ दौऱ्यात भिडे यांनी महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, राष्ट्रध्वज, स्वातंत्र्य दिन, आदींसह देवतांबद्दल गलिच्छ विधाने केली. त्यावेळी त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी, असे न झाल्यास माझ्या हातून त्यांचा 'मर्डर' होईल. यासाठी गृहमंत्री फडणवीस जबाबदार राहतील. सुबोध सावजी हे 1978 ते 80 आणि 1985 ते 90 या काळात मेहकरचे आमदार होते. तसेच 1991 ते 93 दरम्यान व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
हेही वाचा :
Congress Allegation On Sambhaji Bhide: 'संभाजी भिडे म्हणजे भाजपने सोडलेला वळू': काँग्रेसचा आरोप