बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे जुन्या बसस्थानक परिसरातील दुकानांना आग लागल्याची घटना घडली. रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत दोन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
हेही वाचा - धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस चढली बांधावर, 23 जखमी
आगीचे स्वरुप इतके आक्राळ-विक्राळ होती की पाहता-पाहता पाच दुकाने पूर्णपणे या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यात पाचही दुकाने जळून खाक झाली. या दुकानांमध्ये किराणा, स्वीट मार्ट हॉटेल, मोबाईल शॉपी, कृषी केंद्राचा समावेश असून यामध्ये दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी अग्निशमन दलाच्या गाडीसह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तर आग पसरत असल्याने अनेक नागरिकांनी दुकानदारांना साहित्य बाहेर काढण्यासाठी मदत केली. सध्या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.