बुलडाणा - शहरातील चिखली रोडवरील मॉर्डन गादी भंडार व मॉर्डन टायर्सच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यामध्ये गादी भंडार दुकानातील कपाशी, तयार केलेल्या गाद्या, मशीन असे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर, बाजूला असणाऱ्या टायर दुकानातील टायर, टायरट्यूब आणि मशीन असे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही दुकानातील एकूण ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनच्या आदेशामुळे दुकानातील वस्तू काढण्यासाठी वेळ मिळाला नाही, आणि त्यांनतर सर्व दुकाने बंदच होती. दरम्यान मंगळवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटाला शॉर्टसर्किटने मॉर्डन गादी भंडार दुकानात आग लागली. दुकानात कपाशी ठेवल्यामुळे दुकानातील आग तत्काळ पसरली. बाजुलाच लागून असलेल्या मॉर्डन टायर्सच्या दुकानालाही आगीने आपल्या विळख्यात घेतले.
दुकानदार शेख तौफिक आणि शेख मुकीम यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याची माहिती नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाला दिली आणि दुकानाजवळ पोहचून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत गादी भांडार दुकानात ठेवलेल्या कपाशीचे बंडल, नवीन तयार केलेल्या गाद्या, मशीन व टायर दुकानातील टायर, ट्यूब आणि मशीन असे जवळपास ५ ते ६ लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. तलाठी गणेश देशमुख आणि विनोद चिंचोली यांनी या घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी दुकानदार शेख तौफिक आणि शेख मुकीम यांनी केली आहे.