बुलडाणा - आचारसंहिता भंग प्रकरणी दोन ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी आणि लोखंडा येथील हा प्रकार घडला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फिरत्या पथकाच्या प्रमुख सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी आणि लोखंडा येथील मिसाळ व सोळंके नामक दोन ग्रामसेवकांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाकडून लॉन्च करण्यात आलेल्या 'सी-व्हिजिल ऍप्स'वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून फिरते पथक प्रमुख सातपुते यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आंबेटाकळी येथे सभामंडपाचा लोकार्पण फलक व लोखंडा येथे भूमीपूजनाचा फलक झाकलेला स्थितीत नव्हता. आचारसंहिता काळात फलक झाकण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकांची असल्याने त्यांना याप्रकरणी दोषी धरत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आचारसंहिता भंगाचा हा सहावा गुन्हा आहे.