बुलडाणा - लॉकडाऊन असताना विनापरवाना मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूरला जाऊन कोरोना सोबत घेवून येणाऱ्या जळगांव जामोद येथील कोरोनाबाधित रुग्णासह एका जणावर जळगांव जामोद पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१० मे रोजी बुलडाणा जिल्हा कोरोनामुक्त होताच ११ मे रोजी जळगांव जामोदमध्ये १ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सदर कोरोनाबाधित रुग्ण व त्याचा सहकारी हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीकरता विना परवानगी मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर या ठिकाणी गेले होते. यावेळी अंत्यविधीमध्ये असलेल्या काहींना कोरोना झाल्याची माहिती मिळाल्याने त्याने जळगांव जामोदला परत आल्यानंतर येथील आरोग्य यंत्रणेजवळ जाऊन तपासणी केली. त्याचा तपासणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला.
या व्यक्तीने बुलडाणा जिल्ह्यात संचारबंदी तसेच परप्रांतात जाण्यास बंदी असताना विनापरवाना मध्य प्रदेशमध्ये जाऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे, कायद्यानुसार या कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्यासोबतच्या अन्य एका व्यक्तीवर पोलीस हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे यांच्या शासकीय फिर्यादीवरून विविध कलमांनुसार 16 मे रोजी जळगांव पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे, कॉन्स्टेबल योगेश निंबोळकर हे करत आहेत.