बुलडाना - मागील वर्षी भरलेल्या पीक विम्याचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. खामगाव तालुक्यातील शेतकरी अमोल तोंडे, श्रीकिसन पानगोळे यांच्यासह 15 शेतकऱ्यांनी हे निवेदन दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वैरागड या गावातील काही शेतकऱ्यांची शेती खामगाव तालुक्यातील नागझरी खुर्द, झोडगा, नागझरी बु, या गावास शिवारात आहे या शेतकऱ्यांनी 2017-2018 करिता आयसीआयसीआय लोम्बर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पीक विमा काढला होता. सदर विम्याचे हप्तेदेखील भरले होते. मात्र, वारंवार अर्ज करुनही त्यांच्या अर्जाची दखल घेतली गेली नाही. शिवाय, उडवाउडवीची उत्तरे देऊन आम्हाला पिक विमा देण्यापासून वंचित ठेवले आहे, असे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
या वर्षीच्या सततच्या अतिवृष्टीमुळे आमच्या हातात आलेले पीक शेतातच पडले आहे. पंतप्रधान सन्मान योजनेचे सुद्धा पैसे अद्याप पर्यंत कोणालाच मिळालेले नाही. अशा परिस्थितीत आता आम्हाला जीवन जगणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे असह्य झाले. तसेच दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाणे कठीण असल्याने आता आम्हा सर्व शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर अमोल तोंडे, श्रीकिसन पानगोळे, विकी तोंडे, राम निमसे, नारायण कड, अनंता मते, मनोहर तोंडे, सुनील तोंडे, गीता निमसे, शारदा मगर, अरुणा कड, हरिभाऊ पानगोळे, अनिल तोंडे, गोकर्ण तोंडे, मुरलीधर तोंडे, अशा 15 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.