बुलडाणा - खामगांव तालुक्यातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 मधील बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर बसून 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाचा रविवारी सहावा दिवस होता. तसेच शनिवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम अवथाळे यांनी या उपोषणाना पाठिंबा देत स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषणाला सुरुवात केली. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे मागण्या मान्य न केल्यास कालव्याचे पाणी बंद करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अद्याप नुकसान भरपाई नाही -
खामगाव तालुक्यातील निमकवळा, काळेगाव आणि दिवठाना शिवारातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 मधील बाधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत प्रकल्पात गेलेल्या फळबाग, शेतातील झाडे व अन्य नुकसानाची भरपाई मिळालेली नाही. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भात संबंधित विभागाकडे दाद मागितली असता, अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बाधित क्षेत्रातील पिड़ीत शेतकऱ्यांनी थेट निम्न ज्ञानगंगा धरणाच्या भिंतीवर बसून 26 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. यात निमकवळा, काळेगाव आणि दिवठाना शिवरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी बंद करण्याचा प्रयत्न -
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाची व शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळाल्यावर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या उपोषणाना पाठिंबा देत स्वतः शेतकऱ्यांसोबत उपोषण सुरु केले आहे. त्यांनी पवित्रा घेत 24 तासांत उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा त्याच पार्श्वभूमीवर कालव्याचे पाणी बंद करू, असा इशारा दिला होता. रविवारी शाम अवथाळे व उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेप केला. तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपोषण भेट देणार असून तोपर्यंत कालव्याचे पाणी बंद करण्यात येवू नये, असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी संपादित केलेल्या जमिनीच्या फळझाडांचा मोबदला मिळावा, डूबित शेत जमिनीचा मोबदला मिळावा, तसेच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष शाम अवथाळे यांनी दिला आहे.
मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे नाही -
गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू असून त्याठिकाणी ज्ञानगंगा अभयारण्यातील हिंसक प्राण्याचाही शेतकऱ्यांना धोका आहे. अद्यापपर्यंत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट दिलेली नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे.
हेही वाचा - अष्टविनायकाचे दर्शन करून परतताना भक्तांच्या बसचा अपघात, 25 जखमी