बुलडाणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भाजपचे उमेदवार डॉ संजय कुटे यांच्या प्रचारार्थ बुलढाणा येथे सभा होत आहे. मात्र काल रविवारी बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. या आत्महत्येमागे 'घरगुती कलह' हे कारण असल्याचे, प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड या गावातील राजेश ज्ञानदेव तलवारे (३५) याने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असा संदेश देणारा टी-शर्ट अंगात घालत आत्महत्या केली. त्याच्या गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह गावालगतच्या एका शेतात दिसून आला. राजेशच्या नावावर कुठलीही शेती नाही, मात्र गायरान (शासनाची) जमिन तयार करून राजेश त्यावर शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत होता. त्याला पत्नी आणि चार अपत्य आहेत. शेतकऱ्यांना शेतात कामासाठी लागणारे मजूर पुरविण्याचे काम तो करायचा, मात्र काही लोकांकडे त्याचे पैसे थकल्याने आणि मजुरांना पैसे देणे बाकी असल्याने त्याच्यावर २ लाखांहून अधिकचे कर्ज झाले होते.
हेही वाचा... 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या
दरम्यान विधानसभा निवडणुकीत कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या प्रचारार्थ त्याने मागील आठवडा भरापासून परिसर पिंजून काढला होता, असे त्याचे मित्रमंडळी सांगत आहेत. मात्र राजेश तलवारे या युवकाने घरगुती अंतर्गत कलहातून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
हेही वाचा... 'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते'
रविवारी दुपारी राजेश तलवार याचा मृतदेह शेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणून त्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी रुग्णालयात पोहचून राजेशच्या नातेवाईकांची भेट घेतली. या घटनेने खातखेड गावावर शोककळा पसरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी राजेश हा शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.