बुलडाणा - नागपूरच्या कामठी येथील तबलिगी जमातीच्या बुलडाण्यात अडकलेल्या 11 सदस्यांना दहा दिवसांच्या चौकशीनंतर क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सदर तबलिगी सदस्य दिल्ली मरकझ किंवा परराज्यातून आले नसल्याने त्यांना कोरोना आढळण्याचा धोका कमी आहे.
बुलडाण्याच्या मिर्झानगर येथील दारुल उलूम हुसेनिया अरबी मदरसा याठिकाणी नागपूरच्या कामठी येथील 11 तबलिगी ईबादतसाठी 20 मार्चला आले होते. दरम्यान, 22 मार्चला जनता कर्फ्यू आणि 23 मार्चला लॉकडाऊन झाल्यामुळे हे सर्व बुलडाण्याच्या दारुल उलूम हुसेनिया मदरसा याठिकाणी अडकले होते. हे सर्व मदरस्यामधील वेगवेळ्या खोलीत राहत होते.
याबद्दलची माहिती मिर्झानगरच्या नगरसेविकेचे पती मोहम्मद अजहर यांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना दिली. यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांच्या कानावर हा विषय घातला होता. 15 एप्रिलला आरोग्य विभागाचे पथक मिर्झानगर येथील दारुल उलूम हुसेनिया मदरसा याठिकाणी पोहोचले. या 11 सदस्यांची आरोग्याची तपासणी केली गेली.
आरोग्य विभागाने या सदस्यांना सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळून आलेली नसल्याचे प्रमाणपत्र दिले होते. यानंतर या सर्व तबलिगींनी कामठी या आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांच्याकडे विनंती अर्ज करून परवानगी मागितली होती. यावर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी स्थानिक बुलडाणा शहर पोलीस स्टेशनकडून संपूर्ण चौकशी करून अहवाल मागितलाे. अहवालात सांगितल्याप्रमाणे या सर्वांना क्वारंटाईन करून स्वॅबचे नमुने घेण्याकरिता कोरोना स्त्री रुग्णालयात शनिवारी 25 एप्रिलला भरती करण्यात आले आहे.