बुलडाणा - मलकापूर शहरातील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ दोन आरोपींकडून 39 हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे. येथे बनावट नोटांची देवाण-घेवाण होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून बुधवारी सायंकाळी सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपींचे दोन मोबाईल आणि दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील असून शेख कलीम शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अण्णा (वय-40) आणि आमीर सोहेल उर्फ राजू शेख रिसाल उद्दीन (वय-25) अशी आरोपींची नावे आहेत.
मलकापूर येथील वानखेडे यांच्या पेट्रोल पंपाजवळ बनावट नोटांची देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इमरान इनामदार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पो.उप.नि इमरान इनामदार, पो. कॉ. प्रकाश राठोड, पो कॉ. संदीप मोरे. पो. कॉ. नदीम शेख आणि चालक भरत राजपूत यांनी बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. या सापळ्यात शेख कलीम शेख जैनुद्दीन उर्फ कलीम अण्णा शेख आणि आमीर सोहेल उर्फ राजू शेख रिसाल उद्दीन (दोघेही रा. बोदवड) यांना पकडण्यात आले. या दोहोंकडून 200 च्या 173 नोटा, शंभर रुपयाच्या 50 नोटा, असे एकूण 39 हजार सहाशे रुपये तसेच एक दुचाकी आणि दोन मोबाईल, असा एकूण 89 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर मलकापूर शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत