बुलडाणा : प्रेम प्रकरणातून प्रियकराच्या घरी आलेल्या अमरावतीच्या डॉक्टर तरुणीला प्रियकराच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सिंदखेडराजा तालुक्यातील बारलिंगा या गावात गुरुवारी रात्री घडली आहे. बेदम मारहाण केल्यानंतर तरुणीला प्रियकराच्या नातेवाईकांनी गावात सोडून दिले. त्यामुळे रडणाऱ्या या तरुणीच्या मदतीला गावातील नागरिक धाऊन आले. त्यांनी पीडितेला अंढेरा पोलीस ठाण्यात पोहोचवून दिले. पीडितेच्या तक्रारीवरुन अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास पाटील यांनी दिली आहे.
प्रियकराचा फोन न लागल्याने तरुणीने गाठले बारलिंगा : पीडित डॉक्टर तरुणीचे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. मात्र प्रियकर फोन उचलत नसल्याने डॉक्टर तरुणीने थेट प्रियकराच्या घरी येऊन घरच्यांना त्याच्याबद्दल विचारले. यावेळी तिच्या प्रियकराच्या घरच्यांनी तिलाच जबर मारहाण केली. मारहाण करत आरोपींनी तरुणीला अश्लिल शिवीगाळही केल्याने जखमी अवस्थेत असलेली डॉक्टर तरुणी प्रचंड भेदरुन रडत होती.
गावकऱ्यांनी केली पीडितेची सुटका : अमरावतीवरुन अंढेऱ्यातील बारलिंग्यात दाखल झालेल्या डॉक्टर तरुणीला तिच्या प्रियकराच्या नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पीडित डॉक्टर तरुणीला मारहाण करत नातेवाईकांनी गावात सोडून दिले. त्यामुळे अंधारात जखमी अवस्थेत दिसलेल्या तरुणीची गावकऱ्यांनी सुटका केली. रडणाऱ्या पीडितेला गावातील नागरिकांनी अंढेरा पोलीस ठाण्यात पोहोचवून दिले. त्यामुळे पीडितेने तिला मारहाण करणाऱ्या तीन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणीसह प्रियकरही डॉक्टर : डॉक्टर तरुणीला बुलडाणा जिल्ह्यात मारहाण झाल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ अंढेऱ्याकडे धाव घेतली. या घटनेत डॉक्टर तरुणीला जबर मारहाण झाल्याने ती जखमी झाली आहे. दुसरीकडे या घटनेतील प्रियकराने मात्र तरुणी गावात येण्याआधीच गावातून पोबोरा केल्याची चर्चा गावात सुरू आहे. हे दोघेही सोबत वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते, तेथेच त्यांची आधी ओळख आणि नंतर प्रेम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पीडित डॉक्टर तरुणीला मारहाण केल्यामुळे पीडितेने अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन तिच्या कथित प्रियकराच्या नातेवाईकांवर अंढेरा पोलीस ठाण्यात कलम 324, 323, 294, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये तीन आरोपींचा समावेश असून त्यांच्यावर मारहाण आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विकास पाटील यांनी दिली आहे.