बुलडाणा - साखरखेर्डा येथील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शेंदुर्जन येथील डॉ. शिवकुमार काळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी संतप्त महिलांनी रुग्णालयाची तोडफोड देखील केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकरण काय?
पंधरा दिवसांपुर्वी शिक्षक प्रदिप कंकाळ यांच्या बारा वर्षीय मुलाचा बुलडाणा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तत्पूर्वी त्या मुलावर शेंदुर्जन येथील डॉ. काळे यांनी प्रथमोपचार केले होते. मात्र डॉ. काळे यांनी चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार करुन अटक करण्याची मागणी मृताच्या कुटुंबियांनी केली होती. दरम्यान पंधरा दिवसानंतर मुलाच्या कुटुंबातील 20 ते 30 महिला शुक्रवारी अचानक डॉ. काळे यांच्या रुग्णालयावर धडकल्या. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी डॉक्टरांची कार आणि रुग्णालयाची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यानंतर रुग्णालयात शिरुन डॉ काळे, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी यांना लाठ्याकांठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी डॉ. काळे यांनी घराचे दरवाजे बंद करून फोनवरुन मदत बोलावली. या घटेनीची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मारहाण व तोडफोड करणाऱ्या महिलांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले.