बुलडाणा - शुल्लक कारणावरून शहरातील भिमनगर येथे मागील 9 फेब्रुवारी रोजी दोन गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीत 35 वर्षीय कांताबाई नामक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कांताबाईचा खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच कमल भगवान मोरे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी भिमनगर वासीयांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घरात घुसून केला हल्ला-
अंकूश कडूबा साबळे व त्यांची पत्नी कांताबाई अंकुश साबळे हे आपल्या कुटुंबासह अशोक सम्राट नगर येथे राहावयास गेले होते. दरम्यान 9 फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शुल्लक कारणावरून समाधान भगवान मोरे व कमलबाई भगवान मोरे यांनी व त्यांच्या साथीदारांनी अंकुश कडूबा साबळे व त्याची पत्नी कांताबाई अंकूश साबळे यांच्या घरात घुसून त्यांचावर हल्ला केला. या हाणामारीत सर्रास लाठयाकाठया व लोखंडी सळयाचा वापर करण्यात आला आहे.
भगवान मोरे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे-
या मारहाणीत साबळे कुटुंबातील पाच जण जखमी झाले होते. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कांताबाई साबळे यांचा गुरूवारी 11 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या खून प्रकरणातील आरोपींना फाशिची शिक्षा देवून कमल भगवान मोरे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात छाया थाटे, अनिता कुंडेटकर, अनिता जाधव, रेखा पंडीत, चंद्रभागा निकाळजे, वैशाली वाघ, शालु नरवाडे, आशा हिवाळे, रेखा आठवले, ए.एस. इंगळे यांच्यासह शेकडो महिला व पुरूष सहभागी झाले होते.
समाधान मोरे सह तिघांना अटक-
बुलडाणा शहर पोलिसांनी मोरे परिवारातील 11 आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह विविध कालमांव्ये गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी आरोपी समाधान मोरे, रितेश भीमराव खिल्लारे, आकाश कंकाळ यांना अटक करण्यात आली. तर उर्वरित आरोपी फरार आहेत. दरम्यान गुरूवारी 11 फेब्रुवारी रोजी 35 वर्षीय कांताबाई यांचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. यामुळे बुलडाणा शहर पोलिसांनी दाखल केलेल्या विविध कलमांमध्ये हत्या केल्याची नोंद घेतली आहे.
हेही वाचा- डोक्याला मार लागून पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवालामध्ये उल्लेख