बुलडाणा - शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा शासनाने 15 दिवसांपूर्वी घेतला आहे. तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि आता बदलली आहे, असे असले तरी राज्य शासन शाळा सुरू करण्याबाबत सर्व उपाययोजना करत आहेत. शाळांना पालकांनी संमती पत्र दिलेले आहे. 'शाळा सुरू ठेवावी की बंद करावी' याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत माहिती दिली. बुलडाण्यातील शेगांव येथ ते कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिक्षकांच्या तपासणीचा अहवाल प्रलंबित
सोमवार पासून विदर्भातील इयत्ता 9 वी पासून शाळा सुरु होत आहे. आरोग्य प्रशासनाकडून शिक्षक आणि शाळा कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या सुरु आहे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6085 शिक्षकांची कोरोना तापासणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास 3 हजार रिपोर्ट काल शनिवारी आले आहेत. यात 21 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर उर्वरित 3085 शिक्षकांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.
हेही वाचा - हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शाळा उघडण्याचा जिल्हा प्रशासनाला अधिकार
पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील वर्ग नववीपासून पुढील वर्गातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अशी स्थिती नव्हती. आता शासननिर्णयमध्ये म्हटले आहे की, जिल्हा प्रशासनाने त्याची योग्य प्रकारची दखल घ्यावी. जिल्हाधिकारी त्यांचे प्रमुख असल्याने त्यांना जर वाटले जिल्ह्यात शाळा सुरू करणे अडचणीचे होऊ शकते तर त्यांना जिल्ह्यात शाळा बंद किंवा चालू करण्यासंदर्भात मुभा दिली आहे. दुसरी गोष्ट आपण पालकांचे संमती पत्र घेतले आहे. पालकांनी संमतीपत्र दिले आहेत. संमतीपत्रांच्या संख्येवर शाळा सुरु होण्याचा निर्णय अवलंबून असेल, असे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
हेही वाचा - जनतेची जबाबदारी माझ्यावर, हे उघडा ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला