बुलडाणा - जिल्ह्यातील मलकापूर शहरातून गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह रविवारी मध्यप्रदेशातील जंगलात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांसह दोन हजारांहून अधिक नागरिकांनी मुलीचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने परिसरत तणाव निर्माण झाला होता.
१३ जानेवारीला कॉलेजसाठी गेलेली १६ वर्षीय विद्यर्थिनी घरी परतली नाही. पालकांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता केवळ हरवल्याची नोंद करून घेतली. मात्र, शनिवारी रात्री या मुलीचा मृतदेह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहराजवळील जंगलात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून मुलीची ओळख पटवली. रविवारी बऱ्हाणपूर शहरात उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी, मुलीच्या नातेवाईकांसह नागरिकांनी गुन्हागारांना शिक्षेची मागणी करत पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.
हेही वाचा - ...म्हणून जन्मदात्यानेच केला अविवाहित मुलाचा खून
घटनेचे गांभीर्य पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया ढाकणे यादेखील पोलीस ठाण्यात उपस्थित राहिल्या. यावेळी सदर मुलगी १८ वर्षांच्या आतील असतानादेखील अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ हरवल्याची नोंद का करण्यात आली, असा संतप्त सवाल करत ठाणेदार कैलास नागरे यांना नातेवाईकांनी घेराव घातला. त्यांनतर या प्रकरणात अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.