बुलडाणा - सन २००१ साली अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विमा भरपाईची रक्कम मिळण्यासाठी न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणाचा निकाल लागूनही ४ वर्षापर्यंत टाळाटाळ करणाऱया भारत सरकारच्या खामगाव येथील नॅशनल इन्शुरन्स या कंपनीचे साहित्य जप्तीचे आदेश दिवाणी न्यायालयाने देण्यात आले आहे. ग्राहक दिनादिवशीच ही जप्तची नामुष्की विमा कंपनीवर आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाचे बजावणी अंमलदार तसेच मृताचा मुलगा विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल झाल्याने विमा कंपनीच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
सन२००१ मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखांच्या मुलांनी खामगाव येथील न्यायालयात २०१० साली न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयातून प्रकरणाचा निकाल २०१५ साली लागला. मात्र, त्यानंतर ४ वर्षापर्यंत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबवत मृताच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केली. अखेर न्यायालयाने आज जप्तीचे आदेश काढले. शिवकुमार जोशी, शेगाव यांचे वडील मामराज जोशी हे वाहनातून जात असताना रायपूर छतीसगढ येथे ट्रकने वाहनाला धडक दिली होती.
या अपघातात मामराज जोशी यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर थर्डपार्टी विमा मिळावा म्हणून ट्रक मालक सरदार दर्शनसिंह आणि विमा कंपनीविरुद्ध जोशी कुटुंबीयांनी खामगाव येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने २०१५ साली जोशी कुटुंबीयांनी ५ लाख ६४ हजार ३१९ रुपये देण्याचे आदेश दिले. मात्र, विमा कंपनीने टाळाटाळ केल्याने आज जप्तीची कारवाई करण्यात आली. तर आज ग्राहक दिनीच कारवाई झाल्याने न्याय मिळाला असल्याचे जोशी यांनी सांगितले.