बुलडाणा - जामोद तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खेर्डा या गावात शनिवारी सकाळी राहत्या घरी एका 45 वर्षीय दिव्यांग महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच गावातील 'रितेश देशमुख' नामक व्यक्तीला काही तासातच अटक केली होती. आरोपी देशमुखला आज (रविवार) न्यायालयात हजर केले असता त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खेर्डा गावात शनिवारी सकाळी 45 वर्षीय दिव्यांग महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह तिच्या घरात आढळून आला होता. महिलेचा बलात्कार आणि डोक्यावर वार करून हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी जळगाव जा. पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विशेष श्वानाला पाचारण केले होते. तर दुसरीकडे, गुप्त माहितीद्वारे आणि श्वानाने शेजारच्या घरात दिशा दाखविल्याने या प्रकरणी त्याच गावातील रितेश देशमुख नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली. तपासादरम्यान आरोपीच्या पत्नीने पतीने रात्रीच्या वेळेस सदर महिलेची हत्या केल्याचे सांगितल्याची माहिती दिली. तेथून आल्यावर त्याने स्वत:च्या हाताने कपडे धुतल्याचे पत्नीने पोलिसांना सांगितले.
हेही वाचा - बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी जळगांव जामोद पोलीस ठाण्यात आरोपी देधमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला रविवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला 15 डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीने हत्या का केली, या मागचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव हे करत आहेत.
हेही वाचा - बुलडाण्यात खड्ड्यात केक कापून वाढदिवस साजरा, प्रशासनाचा निषेध