बुलडाणा - मोताळा तालुक्यातील धामाणगाव बढे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न शाखा व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या खऱ्या नोटांमध्ये मिसळून या नोटा खपवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या घटनेशी संबंधित चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना न्यायालयाने 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मोताळा तालुक्यातील धामणगाव परिसरातील कुहा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले हा सोमवारी (26 ऑक्टोबर) रोजी दुपारी एकच्या दरम्यान पैसे भरण्यासाठी बँकेत आला. त्याने सोबत 2 लाख 65 हजार रक्कम आणली होती. कॅशियरने नोटा मोजल्यानंतर 365 नोटांमध्ये जवळपास 181 नकली नोटा असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व नोटा 200 रुपयांच्या होत्या. त्याची दर्शनी किंमत 36 हजार 200 रुपये आहे.
आरोपींना 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
शाखा व्यवस्थापक राजेश संजीव सोनवणे यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरु मगरेसे, राहुल गोटीराम साबळे, गोटीराम साबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध कलम 489 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने चौघांना 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार योगेश जाधव पुढील तपास करत आहेत.