बुलडाणा - हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रमाचे संस्थापक शुकदास महाराज यांचा चौथा संजीवन समाधी सोहळा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. विवेकानंद ज्ञान संकुलात हजारो विद्यार्थी आहेत. तसेच, येथे भाविकांची गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. या सर्वांच्या आरोग्याची काळजी आणि कोरोनाबाबत खबरदारी म्हणून विवेकानंद आश्रम विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा सोहळा ३० मार्च ते २ एप्रिल पर्यंत आयोजित करण्यात आला होता.
४ एप्रिल २०१७ रोजी रामनवमीच्या दिवशी संत शुकदास महाराज यांनी स्वतःला ब्रह्मरुपात विलीन करून घेत महानिर्वाण केले होते. तेव्हापासून विवेकानंद आश्रमात रामनवमीला संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचे हे चौथे वर्ष होते. यानिमित्त ३० व ३१ मार्च आणि १ व २ एप्रिल २०२० असे चार दिवस रामकथा व भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, जगभर कोरोना विषाणूने घातलेला धुमाकूळ आणि या सोहळ्यानिमित्त होणारी हजारोंची गर्दी पाहाता, हा विषाणू संक्रमित होण्याचा मोठा धोका होता. या शिवाय, राज्य सरकारनेही गर्दी होतील असे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम टाळावेत, असे निर्देश दिलेले आहेत. यानुसार खबरदारी म्हणून विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत यंदाचा सोहळा रद्द करण्याची सूचना सर्व विश्वस्तांनी केली.
उपाध्यक्ष अशोक थोरहाते व सचिव संतोष गोरे यांनीही विवेकानंद ज्ञान संकुलातील सुमारे सहा हजार निवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि हजारो भाविकांच्या आरोग्याची काळजी पाहता, हा सोहळा यंदा रद्द करावा, अशी प्रमुख सूचना मांडली होती. या सूचनेला सहसचिव विष्णू कुलवंत, आत्मानंद थोरहाते व इतर विश्वस्तांनीही अनुमोदन दिल्यानंतर हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, रामनवमीदिनी म्हणजेच समाधी सोहळ्यादिवशी सकाळी वेद मंत्रोपच्चारात शुकदास महाराजांच्या समाधीचे पूजन केले जाणार आहे. सकाळी प्रसिद्ध गायक अभय मासोदकर व विवेकानंद आश्रम गायकवृंदाचे अनुभूती गायन पार पडणार आहे. तसेच, हभप निवृत्तीमहाराज येवले शास्त्री यांचे गीता व अनुभूती प्रवचनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
समाधीमंदिर दिवसभर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. कोरोनापासून बचावासाठी विवेकानंद आश्रमाच्या आरोग्य विभागाच्यावतीने खेडोपाडी जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी माहिती पत्रके वाटून जनजागृती केली जाईल. कोरोनापासून घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन स्वामी विवेकानंद आश्रमाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : बंजारा समाजाची काशी मानलेल्या पोहरादेवी येथील राम नवमीची यात्रा रद्द
हेही वाचा - राज्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल