बुलडाणा : बुलडाणा तहसील कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कार्यालयातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर तहसील कार्यालय बंद ठेवण्यात आले. तसेच कार्यालयाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे.
55 कर्मचाऱ्यांची तपासणी
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर गुरुवारी इतर सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी अशा जवळपास 55 जणांची आरटीपीसीआर चाचणी तहसील कार्यालताच करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिवसभर कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
नागरिकांना कोरोना तपासणीचे आवाहन
जिल्हा मुख्यालयी असलेल्या बुलडाणा तहसील कार्यलयात तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. महत्वाच्या कागदपत्रांसह प्रशासकीय कामासाठी नागरीकांची वर्दळ येथे सुरू असते. आता तहसीलमधील कर्मचारीच कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपर्कातून अनेकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गेल्या सहा ते सात दिवसांच्या कालावधीत तहसील कार्यालयात आलेल्यांनीही आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार रुपेश खंडारे यांनी केले आहे.
हेही वाचा - प्रसुती झालेल्या कोरोनाबाधित महिलेला डिस्चार्ज; चौकशीकरता समिती स्थापन