बुलडाणा - कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातही अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. मात्र असे असतानाही, लसीकरण झालेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगांव येथील वैद्यकीय अधिकारी 18 फेब्रुवारी रोजी कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे.
लसीची दुसरी मात्रा घेण्याआधीच पॉझिटिव्ह
डोणगाव येथील वैदयकीय अधिकाऱ्याने 28 जानेवारीला पहिली लस टोचून घेतली होती. लसीची दुसरी मात्र घेण्याआधीच ते संक्रमित झाले आहेत. मेहकर तालुक्यातील अधिकारी - कर्मचारी, आरोग्य यंत्रणेसह शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले आहे. डोणगांव येथील एका वैदयकीय अधिकाऱ्याने 28 जानेवारी रोजी लस घेतली होती. लसीची दुसरी मात्रा घेण्यापूर्वीच त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत असल्यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःची कोरोना चाचणी करुन घेतली. त्यांनी घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी दिले, त्यांचा अहवाल १८ फेब्रुवारीला मिळाला आणि वैद्यकीय अधिकारी कोरोना संक्रमित आढळून आले आहे.
याआधी अनेक रिपोर्ट आले होते कोरोना निगेटिव्ह
कोरोना संक्रमित आढळून आलेल्या डोणगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून सातत्याने वैद्यकीय सेवा दिला आहे. त्यासोबतच त्यांनी वेळोवेळी कोरोना चाचणी सुद्धा करून घेतली होती. व्हॅक्सिनेशनपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र लसीकरणानंतर त्यांना उद्भवलेला त्रास आणि त्यानंतर करुन घेतलेल्या चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी होणार शरीरात प्रति पिंड तयार
कोरोना लसीकरणाची पहिली मात्रा घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसऱ्या डोसनंतर 15 दिवसांनी कोविड आजाराशी लढण्यासाठी शरीरात प्रतीपिंड तयार होतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना प्रतिबंधात्मक उपाय, म्हणजे मास्क वापरणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनीटाईझरा वापर करणे याचा अवलंब करावा लागणार आहे.