बुलडाणा - सप्टेंबर 2019 पासून राज्यासह बीएएमएस डॉक्टर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते. मात्र, आरोग्य विभागातील आयुक्तांचे 6 मे रोजीच्या पत्रानुसार बीएएमएस डॉक्टरांच्या पदावर एमबीबीएस डॉक्टरांना एक वर्षासाठी नियुक्तीपत्र देणे सुरू असल्याने कंत्राटी तत्वावर कार्यरत जिल्ह्यातील 44 बीएएमएस डॉक्टरांची सेवा खंडित होणार आहे. त्यामुळे शासनाच्या 'काम सरो, वैद्य मरो' भूमिकेला या कंत्राटी डॉक्टरांनी विरोध दर्शविला आहे. तसेच बीएएमएस डॉक्टरांना सेवेतून कार्यमुक्त न करता त्यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात वेगळे पद तयार करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता बीएएमएस डॉक्टरांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
बीएएमएस डॉक्टरांसाठी वेगळी पद देण्याची मागणी -
गेल्या दोन वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात आपला व आपल्या कुटुंबांचा जीव धोक्यात घालून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने 43 बीएएमएस डॉक्टर 'वैद्यकीय अधिकारी' म्हणून सेवा देत आहेत. रुग्णांच्या हातावर शिक्के मारल्यापासून ते कोरोना रुग्णांची उपचार करणे व लसीकरणाच्या नियोजनापर्यंत या बीएएमएसच्या सर्व कंत्राटी डॉक्टरांनी सेवा दिली आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या 6 मे रोजीच्या आदेशानुसार आता या बीएएमएस डॉक्टरांच्या जागेवर एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती होत आहे. यामुळे बीएएमएस डॉक्टरांची सेवा समाप्त करण्याचा शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. 'काम सरो वैद्य मरो' अशा शासनाच्या भूमिकेच्या विरोधात बीएएमएस डॉक्टरांनी विरोध दर्शविला आहे. त्यांचा एमबीबीएस डॉक्टरांचे नियुक्तीवर विरोध नसून आम्ही बीएएमएस डॉक्टरांच्या करिता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेगळी पद निर्माण करावी, अशी मागणी बीएएमएस डॉक्टरांच्यावतीने करण्यात आली आहे.