बुलडाणा - शासकीय कामाचे प्रलंबित बील वरिष्ठाकडे सादर करून त्या बिलाची रक्कम काढून देण्यासाठी ठेकेदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्ह्यातील सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिपक शंकरराव गोरे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी ३ मार्च रोजी सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयातील वाहनतळ परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
एक लाख रुपये मागितली होती लाच -
बुलडाणा शहरातील तक्रारदार ठेकेदारांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या कामाचे बील सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे थकले होते. या कामाचे प्रलंबित बील वरिष्ठांकडे सादर करून त्या बिलाची रक्कम काढून देण्यात यावी, अशी मागणी २ फेब्रुवारी रोजी सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी दिपक गोरे यांच्याकडे केली. गोरे यांनी बील काढून देण्यासाठी ठेकेदाराकडे एक लाख रुपयाची मागणी केली होती. लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये देण्याचे त्यांनी सांगितले.
स्विकारताना अटक -
दरम्यान, २ मार्च रोजी संबधित ठेकेदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी ३ मार्च रोजी एसीबीच्या पथकाने सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी संबधित ठेकेदाराकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्विकारताना कारकून दिपक गोरे या कर्मचाऱ्याला पथकाने पकडून अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातून लाचेची 50 हजार रुपयाची रक्कम हस्तगत करण्यात आली.
हेही वाचा - बदनापूर तालुक्यात अफूची शेती; पोलिसांच्या छाप्यात 20 लाखांचे पीक जप्त