बुलडाणा - माळवंडी येथील पल्लवी गणेश चव्हाण या विवाहितेने आपल्या 3 वर्षाच्या जान्हवी चव्हाण चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध रायपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'पतीचे बाहेर संबंध, पत्नीचा करायचा छळ'
'आत्महत्या केलेल्या पल्लवीचा पती गणेश चव्हाणचे बाहेर अनैतिक संबंध असल्याने तो तिचा घरात शारीरिक व मानसिक छळ करायचा. सोबतच पल्लवीचे सासू-सासरे व नणंद हे देखील तिला माहेरून शेतीचा वाटा मागण्यासंदर्भात वारंवार मानसिक छळ करायचे. त्यामुळे या छळाला कंटाळून पल्लवीने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली', असे पल्लवीचे वडिल विष्णू पडोळ यांनी दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. यावरून पती गणेश चव्हाण, सासरा जगदीश चव्हाण, सासू सुमन चव्हाण आणि नणंद रेखा सावळे यांच्यावर कलम 498 अ, 306.323.34 भादंविनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे करीत आहेत.
अशी आली घटना उघडकीस
माळवंडी शिवारमधील गट क्रमांक 184 मधील शेतातील विहिरीत एक महिला व मुलीचे शव तरंगताना दिसले. याची माहिती पोलीस पाटील संजय चव्हाण यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याबाबतची माहिती रायपूर पोलीस स्टेशनमध्ये दिली. यावरून पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. हे मृतदेह पल्लवी गणेश चव्हाण व तिची मुलगी जान्हवी चव्हाण यांचे असल्याची ओळख पटली.
हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान