बुलडाणा - लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला झालेल्या मतदानावेळी १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी मॉकपोलचे मतदान सर्वसामान्य मतदानात समाविष्ट केले. त्यामुळे आज २४ एप्रिलला फेरमतदान घेण्यात आले. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत याठिकाणी ७०.८१ टक्के मतदान पार पडले.
मॉकपोलचे मतदान सर्वसामान्य मतदानात समाविष्ट केल्यामुळे राज्याचे उपसचिव तथा सह निवडणूक निर्णय अधिकारी यांनी धडक कारवाई करत मतदान केंद्र प्रमुखासह ४ जणांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच २४ एप्रिलला फेरमतदान घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार आज सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेरमतदान झाले. डोणगाव येथील १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रात आज सकाळी ७ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत ७०.८१ टक्के मतदान झाले. या केंद्रावर १८ एप्रिलला मतदान झाले होते. मात्र, मतदान केंद्रावरील पथकाकडून मॉकपॉल केल्यानंतर कंट्रोल युनिटमधील डाटा क्लिअर न केल्याने आणि तासभर काही मतदान झाल्यावर डाटा क्लिअर केल्याने या केंद्रावर फेरमतदान होणार, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी सांगितले होते. त्यानुसार या केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया पार पडली,
या केंद्रावरील मतदानाच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर ५९६ मतदार असून यापूर्वी १८ एप्रिलला त्यापैकी प्रत्यक्षात ४१४ जणांनी मतदान केले होते म्हणजे एकूण ६९ टक्के मतदान झाले होते.