बुलडाणा - जिल्ह्यासह महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना जिल्ह्यात दुष्काळी दौरे करत दुष्काळाची माहिती घेत त्यावर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थितीचा आढावा घेत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचा जिल्ह्यातील दुष्काळाबाबतची अज्ञानता समोर आली. पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री येरावार म्हणाले, जनावरांसाठी चारा छावण्या उघडल्या आहेत. जिल्ह्यात एकूण किती चारा छावण्या उघडल्या आहेत या प्रश्नावर आपण कुठेतरी चुकतोय ही बाब लक्षात येताच पालकमंत्र्यांनी पत्रकारांसमोर आपल्या स्वीय सहायकाकडून माहिती घेत चारा छावण्याबाबत केलेल्या वाक्यावरून घूमजाव केले.
प्रत्यक्षात जिल्ह्यात एकही चारा छावणी उघडलेली नाही. यामुळे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकरणाऱ्या पालकमंत्री येरावारांची बुलडाणा जिल्ह्याच्या दुष्काळाबाबत अज्ञानता समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, तर जनावरांना चारा नसल्याने जिल्हाभरात शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढले आहेत. जिल्ह्यात लहरी आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात सध्या दुष्काळ आहे. अनेक तालुक्यांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, तर जनावरांना खाण्यासाठी चारा नाही. अशा स्थितीमध्ये शेतकरीवर्ग आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, घेणारेही उपलब्ध नसल्याने दोन्हीकडून शेतकऱ्यांची अडचण होत आहे. जनावरांना चारा नसल्याने जिल्ह्यात शासनाने चारा छावण्या उघडाव्यात अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही छावणी सुरू करण्यात आलेली नाही, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे या उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी दौरा सुरू केला आहे.
यावेळी त्यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा गावाला भेट दिली. भेटीदम्यान त्यांनी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीची पाहणी केली. पाणी पातळीवर गावच्या नागरिकांशी संवाद साधला. दौऱ्यामध्ये पालकमंत्री येरावार यांनी पत्रकारांना दुष्काळाबाबत माहिती देताना बुलडाणा जिल्ह्यात काय काय उपाययोजना केल्या याची मोठ्या तोऱ्यात यादी मांडली. यावेळी जनावरांसाठी चारा छावण्या उघडल्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात एकूण किती चारा छावण्या कोणत्या तालुक्यात उघडल्या, या विचारलेल्या प्रश्नावर आपण कुठेतरी चुकतोय ही बाब लक्षात येताच त्यांनी लगेच आपले स्वीय सहाय्यक केतन केसोडे यांना जिल्ह्यात किती ठिकाणी चारा छावण्या उभारल्या आहेत याची माहिती द्या, असे सांगताच स्वीय सहाय्यक यांनी छावण्या सुरु करण्यात आल्या नाहीत. मात्र प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.