बुलडाणा - चिखली येथे २७ एप्रिलला रात्री १ वाजण्याच्या दरम्यान २ नराधमांनी ९ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दुसरा आरोपी निखिल गोलाईत (रा.पुंडलिकनगर) याला २८ एप्रिल रोजी जालना येथून अटक केले आहे. दरम्यान पिडीत मुलीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच राहणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीला दोन तरुणांनी शनिवारी २७ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अपहरण करुन पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला मौनीबाबा संस्थानासमोर सोडण्यात आले होते. मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर बोरकर (वय २८ रा.गौरक्षण वाडी चिखली) या नराधामाला तातडीने अटक केली होती. तर २८ एप्रिल रोजी दुसरा आरोपी निखिल गोलाईत रा. पुंडलिकनगर जालना येथून पोलिसांनी अटक केले आहे.