बुलडाणा - राज्यात भाजपला डावलून महाविकास आघीडीची स्थापना झाली; आणि त्याचे नेतृत्व स्वीकारुन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राज्यात महाविकास आघाडीचे नवीन समीकरण दिसणार आहे. परंतु, जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजप आणि राष्ट्रवादीची युती असल्याने आता भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा काढणार का, अशा चर्चा चालू आहेत.
स्थापनेपासून जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, 2016-17 च्या निवडणुकीमध्ये भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या रणनितीमुळे परिषदेत भाजपने मुसंडी मारली. यानंतर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. यामध्ये राष्ट्रवादीला उपाध्यक्ष पद, आरोग्य आणि कृषी तसेच सभापती पद देण्यात आले. यावेळी भाजपाने 60 पैकी 24 जागा जिंकल्या. काँग्रेस 14, शिवसेनेला 09, राष्ट्रवादी 09, भारिप 03 आणि अपक्ष 01 जागा मिळाल्या.
2014 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपची सूत्र भाऊसाहेब फुंडकर यांच्या हातात आली. यानंतर राष्ट्रवादीच्या राजेंद्र शिंगणे व भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे या तिघांनी एकत्र येऊन युती केली. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने राष्ट्रवादी व भाजप यांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी महिला(सर्वसाधारण) आरक्षण सुटले आहे. चौथ्यांदा जिल्हा परिषदेवर महिला अध्यक्ष असणार आहे.