बुलडाणा - नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीने तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे 1 एप्रिल रोजी काळ्या फिती लावून कामकाज करत आंदोलन करण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास 15 एप्रिल रोजी लेखणी बंद आणि 1 मे रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनला दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- राज्यातील नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना वेतनासाठी दरमहा १ तारखेपर्यंत अनुदान मिळावे.
- इतर विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागार कार्यालयातून थेट खात्यात जमा करावे.
- सन २०१९ मधील जानेवारी १९ ते ऑक्टोंबर १९ पर्यंतचे थकित अनुदान अद्यापही दिलेले नाही. हे अनुदान तत्काळ वितरीत करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे पगार थेट कोषागार मार्फत करण्यात यावे.
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे फरक हप्ते तत्काळ देण्यात यावे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तत्काळ देण्यात यावी. यासह अन्य मागण्या नगर परिषद कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांची कोविड उपाययोजनांसाठी सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक
हेही वाचा-पुण्यात सात दिवसांची संचारबंदी जाहीर; जाणून घ्या काय बंद, काय सुरू