बुलडाणा - लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नरेंद्र मोदींची त्सुनामी देशात पाहायला मिळाली. महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांची वंचित फॅक्टरला मिळालेली मते युतीला निर्णायक ठरली. त्याच प्रमाणे बुलडाणा लोकसभेतही वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते विजयी झालेले खा. प्रतापराव जाधव यांच्यासाठी निर्णायक ठरले. बुलडाण्यात वंचित फॅक्टरने युतील तारले आणि आघाडीला पाडले. आता विधानसभेत काय होणार यावर चर्चा रंगताना दिसत आहे.
आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ८८ हजार ६९० मते तर शिवसेनेचे विद्यमान खा.प्रतापराव जाधव यांना ५ लाख २१ हजार ९७७ मते मिळाली. तब्बल १ लाख ३३ हजार २८७ मताधिक्याने विजयी ते झाले. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे बळीराम शिरस्कार यांना १ लाख ७२ हजार ७२७ मते मिळवून त्यांनी युतीच्या उमेदवार खा.प्रतापराव जाधव यांना तारले. तर, आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पाडले असल्याचा वास्तव्य निकालाअंती समोर आले. मात्र याला खा. प्रतापराव जाधव मानायला तयार नाहीत.
त्यांचे असे म्हणणे आहे, की 'आघाडीची मते आणि वंचितच्या मतांची बेरीज केल्यानंतर जी संख्या येते त्यापेक्षा त्यांना मिळालेली मते जास्त आहे. यावेळी त्यांनी हेही मान्य केले की विधानसभेत त्याची लढत वंचित फॅक्टर सोबतच राहणार आहे. त्यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारिपचे सर्वासर्वे अॅड. बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली आणि आघाडी सोबत युती न करता महाराष्ट्रभर आपले उमेदवार उभे केले. बुलडाण्यात देखील बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांना निवडणूक रिगणात उतरवले.
बुलडाणा जिल्ह्यात एकूण ७ विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये जवळपास २० लाख मतदार आहे. ज्यामधून मलकापूर विधानसभा क्षेत्र सोडून ६ विधानसभा क्षेत्र बुलडाणा लोकसभेत येतो. यामध्ये १७ लाख ५८ हजार ९४३ मतदार असून दुसऱ्या टप्प्यातील १८ एप्रिल रोजी ११ लाख १७ हजार ४८६ मतदारांनी आपला मतदानांचा हक्क बजावला होता.
तसे पाहिले तर बुलडाणा जिल्हा हा मागासलेला असून येथे कर्जापायी शेतकऱ्यांची आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. रोजगारासाठी औद्योगिक विकास नाही. खामगाव-जालना रेल्वे महामार्ग, जिगांव प्रकल्प रखडलेला आहे. तसेच राखलेले कामे या ५ वर्षात पूर्ण करण्याचा विश्वास निवडून येणाऱ्या खा.प्रतापराव जाधव यांनी दिला आहे.
खामगाव मतदार संघात तर भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनूने यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे खांमगाव आणि शेगांवसह जळगांव जामोद, संग्रामपूर याभागात देखील वंचित फॅक्टर चालेल. सोबतच चिखली, मेहकर, सिंदखेड राजातही वंचित फॅक्टर महत्वपूर्ण राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात ७ विधानसभा क्षेत्र आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खांमगाव, जळगांव जामोद आणि मलकापूर हे विधानसभा क्षेत्र आहे. यामध्ये २ काँगेस, २ शिवसेना आणि ३ भाजपचे आमदार निवडून आलेले आहे. लोकसभेचा निकाल बघतील तर मतदारांनी नरेंद्र मोदीकडे पाहून एक हाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रातून मतदारांनी शिवसेनेला आघाडी दिली आहे. हिदेखील काँग्रेससाठी चिंतनाची बाब आहे.
जर वंचित आघाडीची युती काँग्रेस आघाडी सोबत झाली तर काँग्रेस आघाडीला याचा फायदा होईल. अन्यथा, याचा फायदा भाजप-सेना युतीला हमखास होणार आहे. एवढेच नव्हे, तर मतांच्या विभाजनामुळे वंचित बहुजन आघाडी आणि युती मध्ये लढत होण्याची चिन्हे पाहावयास मिळू शकते. मात्र, वंचित आणि काँग्रेस आघाडीची युती होणार की नाही हे वेळच ठरवेल. युती न झाल्यास वंचित फॅक्टर कोणासाठी निर्णायक राहणार हेदेखील काळच दाखवील.