बुलडाणा - शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भीषण पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिक टँकरवरून एक हंडा पाण्यासाठी जीव धोक्यात घालीत होते. ही भीषण पाणी टंचाई इटीव्ही भारतने समोर आणली होते. प्रशासनाने पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता गावकऱ्यांनी आता कार्डवर पाणी वितरणाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढू लागली आहे. परिसरातील विहिरी, तलाव आटले असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी शेगाव तालुक्यातील चिंचोली, टाकळी वीरो आणि लासुरा या गावांतील रहिवाशांची वणवण सुरू आहे.
या परिसरात असलेल्या आजूबाजूच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहचू लागल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता कायमस्वरूपी नळयोजनेची मागणी केली आहे. चिंचोली गावामधील चित्र बघितले तर दगडालाही पाझर फुटेल अशी स्थिती आहे. गावात टँकर येण्यापूर्वी लहान मुले नळ्या आणि पाईप घेऊन गावाच्या वेशीजवळ बसलेली असतात.
तालुक्यात असणारं ५ हजार लोकसंख्येच चिंचोली गाव खामगाव शेगाव राज्य मार्गापासून २ किलोमीटर आत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचे बहुतांश स्त्रोत आटले असून आता गावकऱ्यांना फक्त आणि फक्त प्रशासनाने सुरु केलेल्या टँकरवरच अवलंबून राहावे लागते आहे.
गावामध्ये टँकर यायच्या अगोदर पाणी मिळावं याकरिता लहान लहान मुलं पाईप आणि नळी घेऊन रस्त्याच्या कडेला वाट बघत उभे असतात. पाण्यासाठी होत असलेली भांडणं आणि संघर्ष पाहता पोलीस बंदोबस्तासह समस्त गावकऱ्यांनी आता रेशन कार्डवर पाणी वितरणाचा निर्णय घेतला आहे.