बुलडाणा - शहरातील शहर पोलीस ठाण्याची इंग्रजकालीन शासकीय इमारत जमीनदोस्त होणार आहे. याठिकाणी पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत उभी करण्यात येणार आहे. सध्या पोलीस ठाणे चिखली रोडवरील पब्लिक शाळेत हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांची इमारत देखील इंग्रजकालीन आहे. मात्र, ही इमारत जतन करण्यात येणार आहे. पोलीस लाईनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय बांधण्यात येणार आहे.
बुलडाणा शहर पूर्वी खूप थंड हवेचे ठिकाण होते. त्यामुळे इंग्रज आपला कारभार बुलडाण्यातून चालवत होते. त्यासाठी त्यांनी अनेक इमारती उभारल्या होत्या. इंग्रजांनी १९०७ साली बांधलेल्या इमारतीमध्ये स्वातंत्र्यानंतर बुलडाणा शहर पोलीस ठाणे, तर १९१२ साली बांधलेल्या इमारतीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय प्रस्थापित करण्यात आले. या इमारती जीर्ण झाल्यामुळे पोलीस ठाण्याची इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत बांधून देण्यात येणार आहे. त्याचठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे कार्यालय असणार आहे. तसेच जुन्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या जागेवर नवीन पोलीस अधीक्षकांचे कार्यालय आणि प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे.
पोलीस मुख्यालयामध्ये ११५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शासकीय निवासस्थान, असा ३८ कोटी ८४ लाख ५२ हजार रुपयांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या कार्यारंभाचे आदेश गेल्या जुलैमध्येच आले होते. त्यानुसार बांधकामाला सुरुवातही झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे कार्यालय हे इंग्रजकाळीन १९१२ ला स्थापन झालेल्या इमारतीच्या मूळ जागेवर प्रस्तावित होती. मात्र, पोलीस महासंचालक यांच्या शिफारशीनुसार या इंग्रजकालीन इमारतीचे जतन करण्यात येणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कार्यालय पोलीस लाईनमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे.