बुलडाणा - बोलेरो पिकअप आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास जानेफळ-मेहकर मार्गावरील जिजामाता नगर जवळ घडली. या अपघातात आणखी दोन जण गंभीर झाले आहेत. ओम गजानन मोसंबे आणि अक्षय गजानन भाकडे, अशी मृतांची नावे आहेत. तर दोन्ही जखमींना उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका दुचाकीवरून चार जण प्रवास करत होते.
ओम गजानन मोसंबे, अक्षय गजानन भाकडे, नागेश गजानन मोसंबे (सर्व रा. मोसंबे वाडे ता. मेहकर) आणि अनंता दत्तात्रय रींढे (रा. परतापूर) हे चारही जण दुचाकीने (क्र. एम. एच. २० ई झेड २९०४) मोसंबेवाडी येथून जानेफळकडे येत होते. तर बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. २८ बीबी ०५६०) ही गाडी फोटो फ्रेमिंगचे साहित्य घेऊन शेगाववरुन मेहकर येथे जात होती.
जानेफळ-मेहकर मार्गावरील जिजामाता नगर जवळ दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात ओम गजानन मोसंबे आणि अक्षय गजानन भाकडे हे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नागेश गजानन मोसंबे आणि अनंता दत्तात्रय रींढे (रा.परतापूर) हे दोन्ही गया दोघांना गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना खासगी वाहनातून मेहकर येथे उपचारासाठी पाठविले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातानंतर बोलेरो पिकअप वाहन चालक अनिल सुरेश सोनुने (रा.शेगाव) जानेफळ पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास सुरू आहे.