बुलडाणा- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी घेण्यात आली. रविवारी १ सप्टेंबर रोजी बुलडाण्याच्या शाहू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चाचपणी प्रक्रिया घेण्यात आली होती. यावेळी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मलकापूर विधानसभा मतदार संघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले भाजप विस्तारक विजय प्रल्हादराव गव्हाड यांचे समर्थक निलेश एन्डोले हे त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना अर्ज न देता मलकापूरचे आमदार संचेतींचे समर्थक शिवचंद्र तायडे यांनी त्यांना खोलीत डांबून मारहाण केली. त्याचबरोबर शिवचंद्र तायडे यांनी संचेती यांच्या विरूद्ध उभे राहण्याकरिता अर्ज भरल्यास एन्डोले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एन्डोले यांच्या मोबाईलमध्ये या घटनेची चित्रफिती कैद होती. मात्र तायडे यांनी तो मोबाईल देखील त्याच्यापासून हिसकावून घेतला, अशी तक्रार निलेश एन्डोले यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
जाणून घ्या कोण आहेत शिवचंद्र तायडे
या प्रकारामुळे मलकापूर विधानसभेमधील भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मलकापूर विधानसभेचे आमदार चैनसूख संचेती हे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष असून गेल्या २५ वर्षांपासून ते इथे आमदार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे यांचे पतीदेव शिवचंद्र तायडे हे आमदार चैनसूख संचेती यांचे खांदे समर्थक आहे.