बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहर आणि तालुक्यातील भागात स्वस्त धान्य दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा केला जात आहे. किडलेला, सडलेला, कुजलेल्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे व माती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
नोव्हेंबर महिन्याचे धान्य सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना वितरित करण्यात आले. या दुकानदारांनी धान्याचे वितरण ग्राहकांना सुरू केले आहे. मात्र, खामगाव शहर आणि परिसरातील काही भागांत निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण केले जात आहे.
गरीब कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानामधून दोन रुपये दराने गहू तर तीन रुपये दराने तांदूळ प्रति किलो देण्यात येते. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने रेशनिगंचे धान्य घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी दुकानदारांकडे तक्रार केल्यास सरकारकडून निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील वाडी येथील स्वस्त धान्य दुकानांतील मिळालेल्या धान्याला कीड लागलेली आहे. गव्हात अळ्या, तांदुळात भोंगी व कचरा असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. सरकारी नियमाप्रमाणे धान्यही मिळत नसल्याची ओरडही परिसरातील नागरिक करत आहेत. दर महिन्याला स्वस्त धान्याचे वाटप करण्यात येत नाही. याबाबत नागरिक संतोष दामोदर यांनी तहसीलदार डॉ. रसाळ यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चांगल्या धान्याचा पुरवठा व्हावा -
मागील काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडू लागले आहेत. धान्याचे दरही आवाक्याबाहेर गेल्यामुळे घरखर्च भागविताना सामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील महिन्यात वितरित करण्यात आलेल्या धान्यात मातीचे ढेकूळ, सिमेंटचे खडे आढळून आले. दुष्काळी परिस्थितीमध्ये कित्येक कुटुंबे रेशनच्या धान्यावर उदरनिर्वाह करीत आहेत. त्यातही भेसळ होत असल्याने गरीब कुटुंबातील लोक हवालदिल झाले आहेत.
गांभीर्याने दखल घेण्याची गरज-
दरमहा रेशनमधील गहू घेतल्यानंतरही त्यात मिसळण्यासाठी चांगले गहू विकत आणावे लागतात. साधारण दहा किलो रेशनच्या गव्हात दोन किलो चांगल्या प्रतिचे महागडे गहू मिसळावे लागतात. गहू दळून आणल्यानंतर पीठ मळताना त्यामध्ये कोमट पाणी घालावे लागते. ही उठाठेव केल्याशिवाय चपाती खाण्यायोग्य होत नाही.
चांगल्या दर्जाच्या धान्याचा पुरवठा होण्यासाठी सरकारकाने कार्यवाही करावी, अशी मागणी रेशनकार्डधारकांनी केली आहे. पंजाबसह राजस्थान, हरियाणा या राज्यांमधील पावसाने काळवंडलेला गहू राज्यात रेशन दुकानांमधून वितरित केला जात आहे.