बुलडाणा - मोताळा येथील हिमांशू झंवर याच्याकडून मंगळवारी (15 डिसेंबर) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त केली होती. या प्रकरणात गुरुवारी (17 डिसेंबर) अजून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
हिमांशू झंवर यास अटक करून बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी केली असता त्याने दोन गावठी पिस्तूल भुसावळ येथून आणल्याची कबुली दिली. त्यापैकी एक हिमांशू झंवर त्याच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जप्त केले होते. तर दुसरे पिस्तूल त्याने मलकापूर येथील सुरेश भगवान तायडे यास दिल्याचे सांगितले. त्यावरून गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने मलकापूर येथील सालपुरा भागात राहणाऱ्या सुरेश भगवान तायडे यास ताब्यात घेतले असून, त्याच्या घरातून एक गावठी पिस्तूल अंदाजे किंमत 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक नागेश कुमार आहेर, पो.ना. रघुनाथ जाधव, युवराज शिंदे, सतीश जाधव, वैभव मगर, गजानन गोरले, विजय वारुळे, विजय सोनवणे, नदीम शेख, सरिता वाकोडे, राजू बोराडे, राहुल आडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.