बुलडाणा - सध्या राज्यात शेतकऱ्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई, पीक विमा मिळत आहे. त्यासंदर्भातील कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाची आवश्यकता आहे. मात्र, नांदुरा तालुक्यातील शेंबा गावातील तलाठी कार्यालय मागील पंधरा ते वीस दिवसांपासून उघडलेच नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी बंद तलाठी कार्यालयाच्या फलकाला चपलांचा हार घातला.
शेंबा गावात तलाठी कार्यालय असून हे कार्यालय मागील काही दिवसांपासून बंद आहे. गावासाठी नियुक्त असलेले तलाठी गावाकडे फिरकतही नाही. शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाची गरज असताना, तलाठी सपशेल दुर्लक्ष करत आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; दोन्ही शिवसेनेचेच
पी. एम. किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तलाठी कार्यालयातील कामांअभावी शेतकऱ्यांच्या सरकारी प्रक्रिया अडकून पडल्या आहेत. तलाठ्यांना अनेक वेळा फोन करूनही ते गावात येत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गावातील तलाठी कार्यालयाला चपलांचा हार अर्पण केला.