बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी शुक्रवारी चिखली येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित असणार आहेत.
जिल्ह्यातील श्वेता महाले (चिखली), डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद), चैनसुख संचेती (मलकापूर), आकाश फुंडकर (खामगाव) तर शिवसेनेचे डॉ. संजय रायमुलकर (मेहकर) डॉ. शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) व संजय गायकवाड (बुलडाणा) हे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुलडाण्यात येणार आहेत.
हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा
या सभेत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन अमित शाह करणार आहेत. सभेची पूर्व तयारी गुरुवारी सकाळपासून सुरू करण्यात आली आहे. जवळपास 20 हजार नागरिकांना सभेत उपस्थित राहता येईल अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. या सभेमध्ये अमित शाह यांच्या बरोबर भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे या देखील उपस्थित राहणार आहेत.
खासदार प्रतापराव जाधव आणि भाजप जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.