बुलढाणा - जिल्ह्यातील नांदुरा शहरात जगातील सर्वात मोठ्या एकशे आठ फूट उंच, अशी हनुमान मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. या मूर्तीला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी दूरवरून नागरिक येत असतात. दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठमोठे धार्मिक कार्यक्रम ( Hanuman Jayanti 2022 ) होतात. कोरोनाच्या काळानंतर तब्बल दोन वर्षांनी याठिकाणी हनुमान जयंतीनिमित्त शनिवार, (ता. 16) ला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्ष कोविडच्या प्रादुर्भावामुळे हनुमान जयंती साजरी होऊ शकली नाही. परंतु, यावर्षी नांदुरा शहरात मोठी हनुमान 108 फूट मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थान व हनुमान भक्तांतर्फे हनुमान जयंती जल्लोषात साजरी करण्याचे नियोजन करण्यात ( Hanuman Jayanti Celebration ) आले आहे. सकाळी सहा वाजता कलश स्थापना, हनुमानजीची पूजा, 1008 पानाने पूजा, पंचामृत अभिषेक, सकाळी दहा वाजता हनुमान मूर्तीला 108 फूट उंचीचा हार करण्यात येईल. साडेदहा वाजता होम-हवन, दुपारी दीड वाजता महाप्रसाद, दुपारी चार ते नऊ रात्रीपर्यंत मिरवणूक, मिरवणुकीमध्ये वारकरी बंधूंची दिंडी राहणार आहे.
दोन एकरमध्ये मूर्ती - नांदुऱ्यातील मोहनरावांनी हनुमानाची 108 फूट उंच मूर्ती उभारली. 1999 ते 2009 मध्ये ही मूर्ती उभारणीचा पूर्ण खर्च 70 लाख रुपये झाला. 7 नोव्हेंबर 2001 ला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन समारोह झाला. पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची पूजा अर्चना करण्यात आली. नांदुऱ्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील दोन एकर जागेमध्ये ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. 14 हजार चारशे चौरस फूट जागेत या मूर्तीला घडविण्यात आले आहे. मोहनराव त्यांचे बंधू नारायणराव, पुल्लराव राजगोपाल या तीन बंधूंनी व मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांनी स्थापन केलेल्या संस्थेद्वारे या मंदिराचे काम पाहिले जात आहे.