बुलडाणा - नकली सोने गहाण ठेवून जिजामाता महिला नागरी सहकारी बँकेला २८ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. त्यानंतर आता बुलडाणा अर्बन पतसंस्थेतही नकली सोने गहाण ठेवून ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा-बुलडाणा; नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना
या प्रकरणी बुलडाणा अर्बन बँकेकडून राजेंद्र वानरे यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन्ही नकली सोने गहाण प्रकरणाचा आकडा 1 कोटी 7 लाख 87 हजार एवढा आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण 9 आरोपींना अटक करून धातूच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देणारी मशिनही जप्त केली आहे.
बुलडाणा जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेत नकली सोने गहाण ठेवून 10 कर्जदारांनी 16 कर्ज प्रकरणात 28 लाखांचे कर्ज घेतले होते. यात बॅंकेतील कर्मचाऱ्यानेच सोने असली असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. याप्रकरणी सोने तपासणारा दिपक हरीश वर्मा, संजय शंकर मठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कैनियालाल बद्री नारायण वर्मा, प्रविण रमाकांत वाडेकर, विकास पेटकर, प्रकाश बाबुराव वाघ यांच्यासह एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर आनंद देशमुख वैभव मोरे आणि प्रसाद राऊत फरार आहेत.
जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेत सोने तपासणारा दिपक वर्मा हा कर्मचारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत नोकरीवर असल्याने बुलडाणा अर्बन पतसंस्थेतूनही अशाप्रकारे याच टोळीने नकली सोन्यावर कर्ज घेतले. यात 79 लाख 87 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. ज्यामध्ये संजय मठारकर यांनी 28 लाख 65 हजार, प्रकाश वाघ यांनी 19 लाख 52 हजार, प्रसाद राऊत यांनी 15 लाख 52 हजार, आंनद देशमुख यांनी 12 लाख 10 हजार, विकास अशोकअप्पा पेटकर यांनी 4 लाख 45 हजार रुपये, अशा प्रमाणे एकूण 79 लाख 87 हजार रुपयांची बुलडाणा अर्बन पतसंस्थेची फसवणूक झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कांबळे करीत आहेत.
कसे घेतले कर्ज -
बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेत आणि बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सोने तारण कर्ज प्रकरणात सोन्याचे प्रमाणपत्र देणारा आरोपी दिपक वर्मा याने नकली सोने गहाण ठेवल्याच्या प्रकरणात असली सोन्याचे प्रमापत्र दिले. बुलडाणा अर्बन पतसंस्थेत सोने तपासणारी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्या मशीनमध्ये सोने तपासणी केली जाते. त्यामुळे आरोपींनी शक्कल लढवत चिखली येथील संजय मठारकर यांच्याकडून असली सोन्याचा मुलामा नकली सोन्यावर लावला. ते सोने मशिममध्ये 80 टक्के असल्याचे दाखवत होते, अशा पद्धतीने कर्ज घेण्यात आले.
बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत 80 लाखांची फसवणूक तर संपूर्ण 445 शाखेत कितीची फसवणूक?
नकली सोने गहाण ठेवून बुलडाणा अर्बन पतसंस्थेत कर्ज घेतल्याप्रकरणी 80 लाखांची फसवणूक बुलडाण्यातील मुख्य शाखेतून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बुलडाणा अर्बन संपूर्ण शाखेत अशाप्रकारे नकली सोन्यावर कर्ज प्रकरण झाले आहे का? याबाबत बुलडाणा अर्बनच्या वतीने 445 शाखेत चौकशी सुरू झाली आहे. जर प्रत्येक शाखेत असे कर्ज प्रकरण निघाले तर हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.