बुलडाणा - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या लोकशाहीचा उत्सव ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून शुक्रवारी (15 जानेवारी) साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 527 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. या मतदानाची पुर्वतयारी प्रशासनाने पूर्ण केली असून या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
मतदानासाठी 1 हजार 803 मतदान केंद्र, 2 हजार 516 पथके व 6 हजार 919 कर्मचाऱ्यांची व्यवस्था
मतदानासाठी जिल्हाभर 1 हजार 803 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यात 2 हजार 171 मतदान केंद्राध्यक्षाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रनिहाय 2 हजार 516 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. राखीव मतदान पथकांची संख्या 300 असून मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 6 हजार 916 आहे. तसेच मतदान केंद्रावर 2 हजार 29 शिपायांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 29 ग्रामपंचायत बिनविरोध
जिल्ह्यात एकूण 527 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार होती. मात्र, 29 ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्यामुळे 498 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण 9 लाख 70 हजार 671 मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. यामध्ये 4 लाख 86 हजार 10 स्त्री मतदार असून 4 लाख 84 हजार 661 पुरूष मतदार आहेत. सर्वात जास्त खामगांव तालुक्यात 67 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही एक ओळखीचा पुरावा सोबत असावा लागणार आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मतदारांना निर्भिड वातावरणात मतदान करता यावे, यासाठी पोलीस विभाग सज्ज आहे. तरी मतदारांनी मतदानासाठी घरातून बाहेर पडून भरघोस मतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
ग्रामपंचायत निवडणूकीत बुलडाणा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी महिला आणि पुरुष, असे एकूण 1 लाख 40 हजार 644 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी 51 ग्रामपंचायत 513 सदस्यासाठी 221 मतदान केंद्र आहे.यासाठी 221 मतदान केंद्रनिहाय पथके तयार करण्यात आली आहे. तसेच 24 राखीव पथके तयार करण्यात आली आहे. एकूण ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी 1 हजारहून जास्त कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त केले आहे. आणि नियोजनासाठी 300 कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसह जवळपास दीड हजार कर्मचारीवर्ग काम करत आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेश खंदारे यांनी दिली आहे.