बुलडाणा - गैरप्रकार करून शासनाचा कोट्यवधींचा कर बुडवल्याचा आरोप बुलडाण्याच्या तत्कालीन एआरटीओ आणि सध्याच्या डेप्युटी आरटीओ जयश्री दुतोंडे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संतोष हाडे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.
यासोबतच, शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मोटे यांनीही महिंद्रा आणि टाटा कंपनीसोबत त्यावेळच्या एआरटीओ आणि सध्याचे डेप्युटी आरटीओ अधिकाऱ्यांनी सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुलडाणा डेप्युटी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या झालेल्या तक्रारी संदर्भात चौकशी करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.
टाटा मॅजिक, महिंद्रा मॅक्झिमो डिझेल वाहनावर चढविण्यात आलेला 6+1 चा टॅक्सी परवाना नियम बाह्य चढविण्यात आल्याचा आरोप हाडे यांनी केला आहे. वाहनाच्या इंजिनची क्षमता ही कमी असून जास्त क्षमता असलेला इंजीनचे वाहन नियमानुसार 6+1 टैक्सी परवान्यावर चढविले गेले पाहिजे. विशेष म्हणजे सदर वाहनावर टॅक्सी परवाना चढविताना कमी कर लागते आणि सदर वाहन खासगी पासिंगसाठी वाहनाच्या किंमतीवर 12 टक्के कर लागतो. मात्र सध्याचे डेप्युटी आरटीओ आणि तत्कालीन एआरटीओ असलेल्या जयश्री दुतोंडे यांनी अधिकाराचा गैरवापर करीत 2000 ते 2500 मॅक्झिमो आणि मॅजिक वाहनावर टॅक्सी परवाना चढवून कराच्या स्वरूपात शासनाच्या तिजोरीत येणारे अंदाजे 12 ते 14 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप संतोष हाडे यांनी केला आहे.
हेही वाचा - शिवशाही बसने अचानक घेतला पेट, 25 प्रवासी करत होते प्रवास
दरम्यान, सध्याच्या आरटीओ आणि तत्कालीन एआरटीओ जयश्री दुतोंडे 2011 पासून तीन ते चार वर्षे एआरटीओ पदावर होत्या. त्यांची पदोन्नती होऊन त्या सध्या डेप्युटी आरटीओ पदावर पुन्हा बुलडाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्यावर झालेल्या या आरोप प्रकरणी त्यांनी आपली बाजू मांडत गैरप्रकार केला नसल्याचे म्हटले आहे. त्यावेळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने आणि अमरावती विभागाच्या आरटीए (RTA) च्या नियमानुसारच त्यांनी टाटा मॅजिक, महिंद्रा माक्झिमो डिझेल वाहनावर टॅक्सी परवाना चढविला आहे, असे दुतोंडे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी अमरावतीचे मुख्य आरटीओ गीते यांनी बुलडाणा येथे येऊन चौकशी केल्याचेही सांगण्यात येत आहे. यानंतर तक्रारकर्ते संतोष हाडे यांची तक्रार खरी की खोटी हे तपासाअंती स्पष्ट होईल.
हेही वाचा - 'सूर्य योग्यच ठिकाणी उगवला, लवकरच मध्यप्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रात'