बुलडाणा - शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करायची परवानगी द्या, अन्यथा नक्षली बनून येईल, असे खळबळजनक पत्र बुलडाण्याच्या एका फार्मसीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. यामुळे आर्थिक परिस्थितीने हतबल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्चाबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिक्षणासाठी हवे कर्ज
बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासीबहुल संग्रामपूर तालुक्यातील काकोडा गावात राहणारे बाबाराव मानखैर यांना दोन मूले आहे. मोठा प्रसाद व लहाना वैभव. प्रसाद शेतीत वडिलांना मदत करतो, तर वैभव हा बारावीनंतर धुळे जिल्ह्यातील बोराडी येथील फार्मसी कॉलेजात बी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. बारावीनंतर जवळ असलेल्या पैशाच्या मदतीने वडिलांनी वैभवला फार्मसी शिक्षणासाठी टाकले. पहिल्या वर्षी वैभवला चांगले मार्क्सही मिळाले. वैभव पुढील वर्षात गेला. पण या वर्षी शेतात काही पिकलेच नाही, म्हणून जवळ पैसा नसल्याने दुसऱ्या वर्षाचे शिक्षण थांबविण्याची वेळ आली. वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यापूर्वी मोठ्या अपेक्षेने अर्ज केला होता.
वडिलांवर पीक कर्ज असल्याने बँकेने नाकारले शैक्षणिक कर्ज
वैभवने संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शैक्षणिक कर्जासाठी चार महिन्यापूर्वी मोठ्या अपेक्षेने अर्ज केला. चार महिन्यात अनेखदा बँकेच्या चकरा मारल्या. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वैभव हतबल झाला होता. आज नाही तर उद्या आपले शैक्षणिक कर्ज मंजूर होऊन आपण परत कॉलेजला जाऊ, अशा आशेने तो वाट बघत होता. तोच आता त्याच्या हातात बँकेने तुमच्या वडिलांनी घेतलेले पीक कर्ज न भरल्याने तुम्हाला शैक्षणिक कर्ज देऊ शकत नाही, असे कारण देऊन वैभवच्या हातात रिजेक्शन लेटर दिले आहे.
आत्महत्येची परवानगी न दिल्यास बनणार नक्षलवादी
वैभवच्या हातात शैक्षणिक कर्ज संदर्भात बँकेकडून रिजेक्शन लेटर आल्याने वैभवचे पुढील शिक्षणाचे स्वप्न भंग होत असल्याने त्याने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून आत्महत्येची परवानगी मागितली आहे. इतकेच नाही, तर परवानगी नाही दिली, तर नक्षलवादी बनण्याची धमकीही त्याने आपल्या पत्रात दिली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे व आर्थिक कारणाने शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.