बुलडाणा - जिल्ह्यातील सैलानी येथे 25 कुत्र्यांच्या टोळक्याने 9 वर्षीय मुलाचे लचके तोडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईवर देखील या कुत्र्यांनी हल्ला केला असून, यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शेख अरमान शेख तस्लिम असे आहे. तर, आई नसीमा शेखवर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यातील धर्मापूर येथील मूळ रहिवासी असलेले हे कुटुंब सैलानी येथील बाबाच्या दर्ग्याजवळील टेकडीवर राहत आहे. आज सायंकाळी संदिप सिरसाट यांच्या शेतात कामावर असताना शेख अरमान हा 9 वर्षीय मुलगा खेळत असताना 25 कुत्र्यांच्या टोळीने या मुलावर अचानक हल्ला चढवला. यावेळी आई नसीमा ही मुलाला वाचवण्यासाठी गेली असता तिच्यावरदेखील कुत्रांच्या टोळीने हल्ला चढवला. यात नसीमा शेख ही गंभीर जखमी झाली आहे. कुत्र्यांनी या मुलाच्या गळ्याचे व हात पायाचे लचके तोडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. आई नसीमाच्या पाय व हाताचे लचके तोडले असून, ती गंभीर जखमी झाली आहे. नसीमाला सध्या बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.