बुलडाणा - जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ९ निलगायींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाण्याच्या शोधात असताना या निलगायी विहरीत पडल्या. तालुक्यातील सोनोशी अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाडी शिवारामध्ये ही घटना घडली.
सुखदेव डिघोळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये या गायी मृत अवस्थेत आढळून आल्या. मात्र, दहा ते बारा दिवसांपूर्वी विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. कारण, त्यांचे मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळले. वनविभाला याची माहीती मिळाल्यानंतर ३१ मे ला पंचनामा करण्यात आल्याचे वनरक्षकांनी सांगितले. मात्र, तब्बल दोन ते तीन दिवस होवून सुद्धा अद्यापही निलगायींचे मृतदेह वनविभागाने बाहेर काढले नाहीत.
या घटनेतुन वनविभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. जगंली प्राण्यांसाठी वन विभागाने त्यांच्या अधिवासात पाणवठ्याची सुविधा उपल्बध केली नाही. त्यामुळे प्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. नियोजन शुन्य वनविभाचा कारभार असाच चालत राहिला तर जगंलातील प्राण्यांना पाणीसाठी जीव गमावत रहावे लागेल, असा संताप लोकांमधून व्यक्त होत आहे. वनविभागाने जंगली प्राण्यासाठी पाणवठे तयार करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून होत आहे.