बुलडाणा - नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जांचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोरोना काळात आपला जीवन प्रवास थांबविला आहे. जिल्ह्यात जवळपास 4 महिन्यात 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय नोंद झाली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा परिणाम हा जवळपास सर्वांच्याच उत्पन्नावर झाला आहे. मात्र, सर्वात जास्त नुकसान हे शेतकरी आणि शेतमजुरांचे झाले आहे. त्यामुळे 22 मार्च ते 21 जुलै दरम्यान जिल्ह्यात 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
ज्यापैकी 9 आत्महत्या पात्र ठरल्या आहेत. तर 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या वेगवेगळ्या कारणाने अपात्र झाल्या आहेत. तर 41 आत्महत्यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पात्र ठरलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.