बुलडाणा - कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्वत्र विविध उपाय करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नांद्राकोळी ग्रामपंचायतीनेदेखील गावासाठी अनोखा निर्णय घेतला आहे. गावातील नागरिक अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडताना मास्क न वापरल्यास त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच गावात कोणीही दारूविक्रीसाठी आल्यास संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. याबाबत गावात दवंडीदेखील पिटवण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरापासून जवळच असलेल्या नांद्राकोळी ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीने गावासाठी विविध निर्णय घेतल्याची माहिती सरपंच संजय काळवाघे यांनी दिली आहे.