बुलडाणा - जिल्ह्यात 5 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत, तर दोन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना कोविड रुग्णालयातून वैद्यकीय नियमांनुसार सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 82 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज (शुक्रवारी) आढळलेल्या रुग्णांमध्ये खामगाव येथील पुरवार गल्ली भागातील 27 वर्षीय महिला, शहरातील वावरे ले आऊट भागातील 33 वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील 25 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरूष आणि पलढग येथील 19 वर्षीय तरुणी या सर्वांचा समावेश आहे.
यामध्ये खामगाव येथील पॉझिटिव्ह व्यक्ती ही आधीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे. तसेच बुलडाणा, पलढग आणि शेलापूर येथील व्यक्तींना मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.
आज बरे झालेल्यांमध्ये भीमनगर, मलकापूर येथील 38 वर्षीय पुरूष आणि मोताळा तालुक्यातील सावरगाव जहाँ येथील 35 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे, तर शेगाव येथील रुग्णालयातून एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली.
तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 51 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 46 अहवाल कोरोना निगेटिव्ह आहेत, तर 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 1416 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत, तर 50 कोरोनाबाधित निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय नियमांनुसार सुट्टी देण्यात आली आहे.
सध्या रुग्णालयात 29 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली.